आगामी निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच; विकासाचा मुद्दा राहिला बाजूला
| खोपोली | प्रतिनिधी |
डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुका होण्याचे संकेत मिळत असल्याने या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप या प्रमुख पक्षांमध्ये महायुतीमध्ये असले तरी उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रमुख पक्षांमध्ये आर्थिक निकषांवर उमेदवारी देण्याचे निकष लावण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. सध्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून आर्थिक निकष पुढे आला असल्याने आगामी निवडणुका मोठ्या रंगतदार होणार यात शंका नाही.
दरम्यान, इच्छुक उमेदवारांना आर्थिक बाजूची काय, तयारी आहे असे कार्यकर्त्याच्या बैठकीत विचारणा होत असून उमेदवार स्वता सक्षम असेल तरच उमेदवारी दिली जाईल असा फतवा प्रमुख राजकीय पक्षांनी काढला असल्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. तर शिवसेना शिंदे गटात खालापूर मध्ये कर्जत तालुक्यातील उमेदवार ही तयारीत असल्याची ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आर्थिक जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या आधी विकासाचा मुद्दा व दांडगा जनसंपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला सहज उमेदवारी दिली जात होती.
खालापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती यासह खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. आरक्षण सोडती नंतर निवडणूक लढविण्याची इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून, वेगवेगळे उपक्रम व भेटीगाठी वर भर देत सणांचे निमित्त साधून बॅनरबाजी ही गावाच्या वेशी जवळ आपापल्या मतदार संघात झलकल्याचे चित्र खालापुर तालुक्यासह खोपोली शहरात दिसत आहेत. तर गावोगाव बैठकांमध्ये गावच्या विकासकांची चर्चा ही करताना इच्छुक उमेदवार दिसत आहेत. तर गावगावात इच्छुक उमेदवारांचे समर्थक पक्षाचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. मात्र, खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट तसेच भाजपा, शिवसेना ठाकरे गट या प्रमुख पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या असून, या बैठकीत इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना फक्त पक्षाकडून येणाऱ्या आर्थिक फंडावर अवलंबून राहू नका स्वताची आर्थिक बाजूची तयारी ही करा व किती असेल ते पक्षाकडे माहिती द्या अशा सूचना ही केल्या जात आहेत. अशा चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.
मात्र, खालापुरात आर्थिक निकषावर कर्जत मधील उमेदवार ही लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. तशा माध्यमातून बातम्या ही छापून आणल्या जात असल्याने आता विकासाच्या गप्पा मारून निवडणूक लढणारे राजकीय नेते आता आर्थिक निकष लावत आहेत. त्यामुळे काम करणारे कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणार तर नेत्याच्या जीवावर निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांची ही आता अडचण निर्माण झाल्याने या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला राहणार यात शंका नाही.
इच्छुकांची दमछाक
खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू असून महायुतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी मोठा संघर्ष सुरू आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपा तयारीत आहे. मात्र, आर्थिक निकष हा मुद्दा कायम असल्याने अनेक काम करणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात दिसणार नाहीत हे तितकंच सत्य आहे, मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार आहे.





