शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील अंजप गावामध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. अंजप गावामध्ये घरासमोरून चारचाकी गाडीमध्ये बैल चोरीला करून फरार झाल्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजप गावामध्ये घरासमोर अंगणात बसलेले बैल असताना दोन चोर गाडीतून उतरून बैलासमोर ब्रेड पाव टाकून बैलाला पकडून गाडीमध्ये भरून घेऊन जाण्याचा प्रकार घडला आहे. अंजपमधील शेतकरी तानाजी गणपत माळी यांचा बैल चोरीला गेला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अन्नातून बैल चोरला जाणे हे मोठे लज्जास्पद गोष्ट घडली आहे. चोरांची एवढी हिंमत वाढण्याचे कारण त्यांच्यावरती बैल चोरीचा मोठा गुन्हा दाखल करून शिक्षा घडत नाही. त्यामुळे अशा चोरांची चोरी करण्याची हिम्मत वाढत आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहेत.
कर्जत तालुक्यामधील अनेक ठिकाणाहून अशा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या चोरावरती योग्य ती कारवाई केली जात नाही, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. नेरळ पोलिसांनी नुकतेच बैलगाडी चोरांची टोळी उद्ध्वस्त केली होती. या टोळीकडून चोरून नेलेल्या अनेक बैलचोरी घटना उघडकीस आणल्या आहेत. त्यामुळे अजप येथील घटना कर्जत पोलीस ठाणे हा प्रकार उघडकीस आणून शेतकऱ्यांना न्याय देणार काय? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.




