पनवेलमध्ये रेती माफियांना ऊत

रेती धुण्यासाठी नाल्यात डेब्रिजचा भराव; रहिवाशांनी व्यक्त केली नाराजी

| पनवेल | वार्ताहर |

रेती धुण्यासाठी नाल्यात डेब्रिजचा भराव केला जात असूनही त्याकडे सिडको आणि पनवेल तहसील कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरात वास्तव्य करणार्‍या रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

बेकायदेशीरपणे रेती विक्री करण्यास मनाई असताना, खारघर सेक्टर-34 मधील रस्त्यावर, परिसरात काही रेतीमाफिया बिनधास्त रेती व्यवसाय करीत आहेत. खारघर सेक्टर-40 ‘सिडको’च्या बागेश्री गृहनिर्माणकडून पेठगावकडे जाणार्‍या रस्त्यालगत नैसर्गिक नाला आहे. इतर ठिकाणाहून रेती आणून या नाल्यात पंप लावून रेती धुवून पहाटे बांधकाम ठिकाणी पाठविली जाते. मात्र, गेल्या काही दिवसापासून नाल्यात डेब्रिज, मातीचा भराव केला जात असल्यामुळे रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.

रेती धुण्यासाठी नाल्यात रात्रभर पंप सुरु असतात. आवाजामुळे प्रदूषण तर होतेच; शिवाय रात्रीच्या वेळी नीट झोप होत नाही. पुढील महिन्यापासून दहावी-बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा होतो. दोन वर्षांपूर्वी सदर नाला परिसरातील रहिवाशांनी पनवेल महापालिका आयुक्त, पनवेल तहसील कार्यालय आणि आपले सरकारवर लेखी तक्रार केली असता, काही दिवस बेकायदा रेती व्यवसाय बंद होता. मात्र, पुन्हा रेती व्यवसाय ‘जैसे थे’ सुरु असून, महापालिका, तहसील आणि पोलीस प्रशासनाने सदर व्यवसाय बंद करावा, अशी मागणी सदर नाल्याजवळ वास्तव्य करणार्‍या रहिवाशांकडून केली जात आहे.

Exit mobile version