| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवसा अखेर जिल्हा परिषद गटांसाठी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वडखळ, शिहू आणि रावे या तीन जिल्हा परिषद मतदारसंघांतून मंगळवार, दि. 20 जानेवारी रोजी शिवसेनेच्या पल्लवी प्रसाद भोईर आणि समीर म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे संजय जांभळे, भाजपचे वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, तसेच अपक्ष म्हणून पल्लवी प्रसाद भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हे सर्व उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रस्थापित चेहरे असून, उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर पेण प्रांत कार्यालयात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या बुधवार हा शेवटचा दिवस असून, नेमके राजकीय चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. युती-आघाडीचे संकेत मिळतात का, याबाबत राजकीय पक्षांचे पदाधिकारी सध्या मौन बाळगत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मंगळवारी भाजप नेते रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आज एका दिवसात 30 उमेदवारांनी 55 कोरे नामनिर्देशन पत्रे दाखल केली असल्याची माहिती प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी दिली. दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी या चार दिवसांत एकूण 193 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून, उद्या हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेसाठी 5 गट, तर पंचायत समितीच्या 10 निर्वाचन गणांसाठी ही नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
22 दादर जिल्हा परिषद गटात भाजपचे रायगड जिल्हा महामंत्री तथा आमदार पुत्र वैकुंठ रवींद्र पाटील यांचा मंगळवारी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. 23 वडखळ जिल्हा परिषद गटात, शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेले संजय जनार्दन जांभळे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडून मिलिंद मोरेश्वर पाटील, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून समीर सुभाष म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या गटात भाजप, शेकाप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात त्रिकोणी व हाय-व्होल्टेज लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विद्यमान विजेते उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार असून, शेकापने आपली विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी संजय जांभळे यांच्यासारखा तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. 25 शिहू जिल्हा परिषद गटात, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी पक्षातर्फे एक व अपक्ष म्हणून एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या गटातून आज निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे एकूण सहा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत.





