| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यामध्ये मच्छीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र दिसत आहे. वातावरणात वारंवार होणारे बदल, अवकाळी पाऊस, समुद्री पाण्यातील बदलणारे पाण्याचे प्रवाह व पाण्याची वाढलेली उष्णता याचा दुष्परिणाम मच्छीवर दिसून येतो. एप्रिल, मे महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पापलेट, हलवा, सुरमई, बांगडा, तारली यासारखी मच्छी सापडत होती. परंतु मच्छीची आवक घटल्यामुळे मच्छिमार बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. मच्छिमारी करीता डिझेल, बर्फ, खलाशांना लागणारे किराणा सामान, पाणी इत्यादी वस्तू मच्छीमारी बोटीवर घेऊन जाव्या लागतात. परंतु त्याचा हि खर्च भागत नसल्याने मच्छिमारी व्यवसाय नुकसानीमध्ये असल्याचे दिसत आहे.
केवळ मांदेली, बीलीज, कोळंबी या बारीक मच्छीच्या व्यतिरिक्त अन्य मोठ्या प्रकारची मच्छी मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बाजारात मच्छी मिळत नसल्यामुळे खवय्यांमध्ये देखील नाराजी आहे. श्रीवर्धन तालुका पर्यटनाच्या दृष्टीने सध्या खूप मोठ्या प्रमाणावर नावारूपाला आला आहे. या ठिकाणी दिवसाकाठी हजारो पर्यटक येत असतात. पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक कोकणात मच्छी खाण्यासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी मच्छी मिळत नसल्यामुळे या ठिकाणच्या व्यापार्यांना बाहेरून मच्छी आणून या ठिकाणी विकावी लागत आहे. त्यामुळे मच्छीचे भाव देखील गगनाला भिडलेले आहेत.