अलिबागच्या गट शिक्षणाधिकार्यांकडून कौतूक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी येथील एका शिक्षकाने ‘माणसाची गोष्ट’ या चलचित्रातून मानवी उत्क्रांतीचा उलगडा केला. अश्मयुगापासून ते वैज्ञानिक युगापर्यंत मानवाच्या राहणीमानात कशा पध्दतीने बदल झाला याची माहिती या चलचित्राद्वारे देण्यात आली. अलिबागचे गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनी नुकतीच भेट देत कौतूक केले.
रमेश धुमाळ असे या शिक्षकाचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घरी सजावट केली. मोबाईलमध्ये रमणार्या पिढीला मानवाची निर्मिती कशी झाली याची माहिती सहज सोप्या पध्दतीने चलचित्राद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. माणूस हा पृथ्वीवरील सर्वात बुध्दीवान आणि सर्वच क्षेत्रात अधिराज्य गाजवणारा प्राणी आहे. मानवाची उत्क्रांती कशी झाली. आफ्रीका खंडात दोन पायावर चालणारा वानर तयार झाला. आफ्रिकेतील नैसर्गिक घडामोडीमुळे वानरांचे स्थलांतर झाले. दोन पायावर चालत भटकू लागला. शिकार करण्याबरोबरच स्वरक्षणासाठी दगडापासून हत्यार तयार केले. ऊन वारा पावसापासून बचाव करण्यासाठी समुहाने गुहेत राहू लागला. हळूहळू त्याच्यामध्ये अमुलाग्र बदल होत गेला. अश्मयुगापासून वैज्ञानिक युगापर्यंत मानवाची प्रगती कशी झाली, याची माहिती या चलचित्राद्वारे देण्यात आली.
याबाबत गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांना माहिती मिळाली. त्यांनी नुकतीच धुमाळ यांच्या घरी जाऊन चलचित्र व देखावे पाहिले. चलचित्रातून इतिहास विषयाची माहिती दिल्याबद्दल त्यांचे कौतूक करण्यात आले.