। रसायनी । वार्ताहर ।
गुळसुंदे येथील अंकुश साठे यांच्या घराबाहेर बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ माजली आहे. गुळसुंदे येथे राहणारे अंकुश साठे यांना पहाटे साडेतीन वाजता घराच्या बाहेर बिबट्या दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. दुसर्या दिवशी अंकुश साठे यांनी बिबट्या दिसल्याची घटना काही ग्रामस्थांना सांगितली. अंकुश साठे यांच्या निवासस्थाना बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात बिबट्या दिसून आला. ही घटना प्राणीमित्र मनोहर कुलकर्णी आणि प्रथमेश मोकल यांना समजली असता त्यांनी आपटा वनअधिकारी व गुळसुंदे ग्रामपंचायतीला या बाबत माहिती दिली. तसेच, बिबट्या दिसल्याने गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्याचे ग्रामपंचायतीला सांगितले.
वनअधिकारी यांनी या सीसीटीव्ही फुटेज व बिबट्या जिथे आला होता तेथील जमिनीवर पाहणी केली असता बिबट्या आल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या येताना व जातानाचे निदर्शनास आले आहे. तसेच, जमिनीवर बिबट्याच्या पायाचे ठसेही दिसले. गुळसुंदे ग्रामपंचायत आणि आपटा वनअधिकारी यांनी परिसरातील ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर एकटे फिरू नये. बाहेर फिरायला जाताना सोबत काठी व बॅटरी सोबत घेवून जावे. आपल्या जवळील पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले आहे. गुळसुंदे परिसर कर्नाळा किल्ल्याच्या जवळ असल्याने त्या परिसरात बिबट्या आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.