। महाड । प्रतिनिधी ।
शासनाकडून गोर गरीबांसाठी अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. या धान्य पुरवठ्यात प्रचंड प्रमाणात गैव्यवहार होत असल्याने नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य उपलब्ध होत आहे. नाईलाजास्तव गोरगरीब नागरिकांना हे धान्य घ्यावे लागत आहे. धान्य पुरवठा करणार्या ठेकेदाराकडून काळाबाजार केला जात असल्याचे राष्ट्र धान्य दुकानदारांचे देखील म्हणणे आहे.
महाड तालुक्यात काही भागांमध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. या धान्यांमध्ये प्रचंड प्रमाणात आळ्या निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. तसेच, अनेक भागांमध्ये प्लास्टिक सदृश्य तांदूळ देखील अनेक वेळा पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामीण भागातील महिलांकडून करण्यात येत आहे. परंतु, महाड तालुक्यात रास्त धान्य गोदामातून चांगल्या दर्जाचा तांदूळ पुरवठा होत असतो. मात्र, ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळत असल्याने पुरवठा दाराकडूनच हा सावळा गोंधळ केला जात असल्याची माहिती एका पुरवठा दुकानदाराने दिली आहे. शिवाय धान्यांच्या गोणींमधून 50 किलो पेक्षा कमी धान्य पुरवठा देखील केला जात आहे. महाड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामधील या सावळ्या गोंधळामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. या कार्यालयात देखील सावळा गोंधळ असून नागरिकांना रेशनिंग कार्ड वेळेत न मिळणे, नावे कमी करणे अथवा वाढवणे या प्रक्रियेला वर्षभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन प्रक्रियेत देखील नागरिकांना वर्षानुवर्ष फेर्या माराव्या लागत आहेत.
रेशनिंग दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य मिळणे ही बाब नवीन नाही. गेली अनेक वर्ष अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून केल्या जात असल्या तरी शासनाकडून या पुरवठा आणि वितरण व्यवस्थेमध्ये कोणत्याच प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही. यामुळे राज्यातील गोरगरीब जनतेला निकृष्ट दर्जाचे धान्य उपलब्ध होते. रेशनिंग वरील धान्य पुरवठा ठेकेदाराकडून परस्पर विकण्याचे प्रकार देखील होत आहेत. अशाच पद्धतीने महाड तालुक्यात गेले अनेक वर्ष एकच ठेकेदार अशा प्रकारे धान्य पुरवठा करताना निकृष्ट दर्जाचे धान्य देऊन गोलमाल करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. गोदामामध्ये चांगल्या दर्जाचा तांदूळ असताना ग्राहकांना मात्र निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा कसा होतो, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी देखील थातूरमातूर उत्तर देऊन हात वर केले आहेत.