पहिल्याच पावसात मिलगाव येथील पूल गेला वाहून

खोपोलीतील मिलगाव आदिवासींचे हाल
निकृष्ट काम करुन ठेकेदार मालामाल
वावोशी | वार्ताहर |
खोपोली नगर परिषद हद्दीतील मिलगाव आदिवासीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यातील नाल्यावर खोपोली नगरपरिषदेकडून साधारण आठ ते दहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले असून, ऐन पावसाळ्यात या आदिवासीवाडीतील ग्रामस्थांची मात्र फार मोठी गैरसोय होऊन बसली आहे.

या पुलाचे काम मुख्य ठेकेदाराने दुसर्‍या सबठेकेदाराला दिले होते आणि त्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हे बांधकाम केले असल्याचे उघड झाले आहे. या पावसाळ्यात पावसाने सुरुवात केल्याने दोन दिवस सतत पाऊस पडल्यामुळे पहिल्याच पावसात नवीन बांधलेला पूल वाहून गेला आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष ,नगरसेवक या ठिकाणी वाहून गेलेल्या पुलाकडे लक्ष देणार का? असा प्रश्‍न येथील आदिवासी बांधव विचारत आहेत.

मिलगाव आदिवासी कातकरी वाडी हे शिळफाट्यापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब आहे. या आदिवासी बांधवांना भाजी खरेदी करण्यासाठी दवाखाना, मोलमजुरीसाठी याच पुलावरून पायी प्रवास करावा लागतो. आदिवासीवाडीकडे जाण्यासाठी या रस्त्याला लाईटची व्यवस्था नसल्यामुळे या आदिवासी ग्रामस्थांना अंधारातूनच प्रवास करावा लागतो. सदर वाहून गेलेल्या पुलाच्या कठड्यावरून ये-जा करणे येथील आदिवासी बांधवांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पुन्हा त्याच खर्चाने मजबूत पूल बांधून घेण्याची मागणी येथील आदिवासी बांधव करीत आहेत.

Exit mobile version