हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत. पण यातले कोटी म्हणजे लाख-कोटीमधले कोटी नसून तेहतीस प्रकारचे असा त्याचा अर्थ आहे, असा पाठभेद आहे. ते काहीही असो, भारतात असंख्य देव आहेत हे नक्की. किंबहुना, देशातील अनेक भागांमध्ये गावाचा म्हणून एक देव आणि त्याचे देऊळ असते. याखेरीज एक देवीही असते. या दैवतांचे वार्षिक उत्सव आणि जत्रा महत्वाच्या असतात. कोकणात तर प्रत्येक गावांमध्ये असे उत्सव हे दसरा-दिवाळीसारखेच साजरे केले जातात. या देवांच्या पालख्या निघतात आणि गावातल्या हरेक घरांमध्ये जाऊन तिथे त्यांची पूजाअर्चा होते. चाकरमानी मंडळी या उत्सवांना किंवा पालख्यांच्या आगमनाच्या वेळी हमखास हजेरी लावतात. गेल्या वर्षीचे नवस फेडतात आणि पुढच्या वर्षीसाठी गाऱ्हाणे घालतात. प्रत्येक गावाचे असे निरनिराळे देव असणे आणि भक्तांच्या घरी जाऊन त्यांनी सर्व कुटुंबांची भेट घेणे असे प्रकार जगातल्या इतर कोणत्याही देशात आणि धर्मात होत असतील असे वाटत नाही. याखेरीज गणपती-गौरी घरी आणणे हा प्रकार आहेच. सारांश, एकच एक देव, त्याचे एकच एक मुख्य देऊळ हा प्रकारच आपल्याकडे नाही. काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि चार धाम यात्रेतील तीर्थस्थळी शंकराचा वास आहे. पण यातले सर्व शंकर हे वेगवेगळे आहेत आणि त्यांची नावेही निरनिराळी आहेत. या यात्रांना व देवस्थानांना महत्व आहे व त्यांच्या यात्रा केल्या तर पुण्य मिळते अशी समजूत आहे. पण समजा यात्रा न घडल्या तरी काहीही बिघडत नाही. माझा गाव हीच माझी काशी आणि हेच माझे रामेश्वर असे म्हणण्याची मराठीत पूर्वापार चाल आहे. अयोध्येत नवे राममंदिर उभे राहत आहे. आणि ते जणू सर्व देशाचे मुख्य देऊळ होणार असल्याचा एक उत्सवी प्रचार मिडियातून सध्या चालू आहे. हा देश अनेकत्वावर उभारलेला आहे. मात्र सध्या रामाच्या नावाने या देशात एक देव, एक देऊळ असे वातावरण निर्माण केले जात आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी
या प्रचारामागे भाजपचा स्वार्थ आहे. त्या पक्षाला 2024 ची लोकसभा निवडणूक विक्रमी मतांनी जिंकायची आहे. त्यासाठी लोकांना भुलवण्याचे उद्योग चालू आहेत. वास्तविक राममंदिर पूर्ण बांधून झालेले नाही. बरेच काम बाकी आहे. अशा मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू नये असे अनेकांचे मत आहे. तरीही नरेंद्र मोदी यांच्या हट्टाखातर 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. अब्जावधी हिंदूंचे श्रध्दास्थान म्हणून मंदिराचे मार्केटिंग केले जात आहे. पण गंमत अशी की, हिंदूंचे धर्मप्रमुख म्हणजे शंकराचार्य त्यांना यात कुठेच स्थान नाही. आपल्या चारही प्रमुख पीठांच्या शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा होणार असेल तर आम्ही तिथे काय नुसते पाहायला जायचे का असा सवाल एका शंकराचार्यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे गाभाऱ्यात असतील. पण खरा फोकस मोदींवर असेल. नंतर त्यांचे एक भाषणही ठेवण्यात आले आहे. आता कार्यक्रम जर धार्मिक आहे तर तिथे मोदी नावाच्या राजकारण्याचे भाषण कशाला असे कोणी विचारायचे नाही. हे भाषण सर्व टीव्ही वाहिन्यांवरून दिवसरात्र कसे दाखवले जाईल याची आपण कल्पना करू शकतो. येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची जणू सुरुवात होईल. यामुळेच काँग्रेसने या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला असून तो अत्यंत योग्य आहे. मोदींची आणि पर्यायाने भाजपची प्रतिमा झळकावण्याचा हा सर्व उपक्रम आहे. बिचारा राम त्यात ओढला जात आहे. भारतभरच्या लोकांवरही अशीच सक्ती केली जात आहे. कोरोना काळात जशा थाळ्या वाजवल्या, तसे आता 22 जानेवारीला दिवे लावा वगैरे सांगितले जात आहे. लोक भाविक आणि साधे असतात. ते यात सहभागी होतीलच. रामाच्या नावाने भाजपला ही येती निवडणूक तर जिंकायची आहेच, पण आणखीही काही साध्य करायचे आहे.
एक देश, एक धर्म, एक देव
चार वर्षांपूर्वी तेलंगणातील चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या एका आमदाराने अयोध्येतील राममंदिरावर टीका केली होती. या मंदिरासाठी देणग्या देऊ नका असे आवाहन त्याने स्थानिक लोकांना केले होते. आपल्याला काय अयोध्येत नेहमी जाता येणार नाही, त्यापेक्षा तुम्ही आपापल्या गावातल्या देवळांसाठी वर्गणी जमवा असे हा नेता म्हणाला होता. यावरून भाजपशी संबंधित संघटनांनी त्याच्या घरावर
दगडफेक केली होती. सत्तारुढ पक्षाचा असूनही या आमदाराला माफी मागावी लागली होती. ही केवळ चुणूक होती. भाजप ठरवेल तोच देव मानला गेला पाहिजे असा हा अघोषित फतवा होता. सध्याचे वातावरण पाहता, आणखी पन्नास वर्षांनी कदाचित गावोगावच्या ग्रामदैवतांपेक्षा अयोध्येचा राम हाच सर्वांचा देव आहे असे या लोकांनी पटवून घेतलेले असेल. तुम्ही रामावर श्रध्दा ठेवता म्हणजे तुम्ही भाजपचे मतदार असणारच असे समीकरण मांडले जात आहे. हिंदू समाजाला एकगठ्ठा आपल्यामागे उभे करण्यासाठी भाजप दर निवडणुकीला नवनवीन मार्ग शोधत असतो. यंदाचा मार्ग राममंदिराचे उद्घाटन आहे. वास्तविक राममंदिराप्रमाणेच अयोध्येत पाडली गेलेली मशीदही पुन्हा उभी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पण मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान वा त्यांच्या सरकारने जसा पुढाकार घेतला तसा उत्साह मशिदीच्या बाबतीत दिसला नाही. तिची चर्चादेखील नाही. उद्या समजा ही मशीद बांधून पूर्ण झाली तर मोदी, संघ आणि भाजपचे कार्यकर्ते असाच उत्सव देशभर साजरा करतील का असा सवाल काही विरोधकांनी केला आहे. त्याचे उत्तर नाही असेच आहे. एक देश, एक धर्म, एक देव आणि या सर्वांचा एक पक्ष अशी रचना करण्याचा हा सर्व खटाटोप आहे. रामाचे नाव पुढे केलेले असल्याने सामान्य लोक आज या खटाटोपात सामील होत आहेत. यात काहीतरी गफलत आहे हेही ते उद्या विसरून गेलेले असतील.