राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेत

महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत
। उना । प्रतिनिधी ।
31 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत इंदिरा स्टेडीयम, नांगल रोड, उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे. उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी तेलंगणावर तर किशोरींनी हरयाणावर विजय मिळवत रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने तेलंगणाचा 11-3 असा एक डाव 8 गुणांनी धुव्वा उडवला. तर महाराष्ट्राच्या किशोरींनी उपउपांत्य फेरीच्या सामन्यात हरयाणावर 11-9 असा एक डाव 2 गुणांनी मोठा विजय साजरा केला. किशोरांच्या इतर सामन्यांमध्ये प. बंगालने कोल्हापूरचा 12-11 असा पराभव केला. कर्नाटकने विदर्भाचा 24-15 असा धुव्वा उडवला. राजस्थानने तामिळनाडूवर 13-8 असा विजय मिळवला. छत्तीसगडने आंध्र प्रदेशचा 10-9 असा पराभव केला. तेलंगणाने उत्तराखंडचा 11-10 असा पराभव केला तर हरयाणाने दिल्लीचा 18-14 असा पराभव केला. तर किशोरींच्या इतर सामन्यांमध्ये कोल्हापूराने उत्तर प्रदेशवर 9-8 असा निसटता विजय मिळवला. हरयाणाने तेलंगणावर 10-1 असा मोठा विजय मिळवला. दिल्लीने केरळचा 20-6 असा पराभव केला.

Exit mobile version