| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव विकास आघाडीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे श्रीवर्धन तालुक्याच्या दौर्यावर आले होते. पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी 18 डिसेंबरला होत असलेल्या 13 ग्रामपंचायत निवडणुका व श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूकी बाबतीत उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत व नगरपरिषदेवर शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) उमेदवार जास्तीत जास्त कसे विजयी होतील त्या दृष्टीने तालुक्यात व शहरात पदाधिकार्यांच्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत.
माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे श्रीवर्धन तालुक्याच्या दौर्यावर आले असून रविवार (दि.20) सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहात काही दिवसांवर येणार्या ग्रामपंचायत व नगरपरिषद निवडणुकां बाबतीत पदाधिकार्यांना मार्गदर्शन व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळेस श्रीवर्धन मतदार संघ संपर्क प्रमुख सचीन पाटेकर, तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर यांनी येणार्या निवडणुकां व उमेदवारां बाबत पदाधिकार्यांशी चर्चा केली.
उपजिल्हाप्रमुख शाम भोकरे यांनी तालुक्यातील राजकीय घडामोडीं वर बोलताना सांगितले की, सध्या मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज आहेत तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर ही नाराज आहेत. नाराज कार्यकर्ते हे लवकरच बाळासाहेबांची शिवसेना यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बोर्लीपंचतन येथील एक शिवसेनेचा पदाधिकारी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधे गेला होता. परंतु तो पदाधिकारी काही दिवसातच शिंदे गटात सामील होतोय. तेरा ग्रामपंचायतीं पैकी किमान आठ ग्रामपंचायतीं वर शिंदे गटाचा झेंडा फडकेल. असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी तालुका संपर्क प्रमुख सुरेश मिरगल, शहरप्रमुख देवेंद्र भुसाणे, महिला शहरप्रमुख सुप्रिया चोगले, शब्बीर उंड्रे, सुमीत काळे हे पदाधिकारी उपस्थित होते.