ऐन उन्हाळ्यात धामोळे ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

| पनवेल | वार्ताहर ।
खारघर शहराला लागून असलेल्या धामोळेगावातील नागरिकांना सध्या ऐन उन्हाळ्यात तीव्र स्वरुपाच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावात आजही टँकरने पाणी येत असल्याने पाणी भरण्यासाठी टँकरसमोर नागरिकांची गर्दी होतांना दिसत आहे. या समस्येकडे संबंधित यंत्रणेचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
खारघर शहराला लागून असलेल्या व पनवेल महापालिकेच्या हद्दीतील धामोळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी गेल्या काही वर्षापासून संघर्ष करावा लागत आहे. आजही टँकरने तेथे पाणी आणावे लागत आहे. तसेच चार दिवसांतून एकदा टँकर येत असल्याने एकदा का गावात पाण्याचा टँकर आला की, या टँकरसमोर पाणी भरण्यासाठी महिला वर्गाची एकच गर्दी होत असते. गेल्या काही वर्षापासून याठिकाणच्या ग्रामस्थांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने हक्ताच्या पाण्यासाठी नागरिकांना टाहो फोडावा लागत आहे. सध्या ऐन उन्हाळ्यात ही समस्या अधिक उग्र रूप धारण करू लागली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. हा जर प्रकार असाच सुरु राहिला तर प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत लवकर तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version