26 लाख प्रवाशांसाठी 81 रेल्वे पोलीस
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलच्या दररोज 600 फेर्या असून 25 ते 26 लाख प्रवासी नित्याने प्रवास करत असतात. मात्र या प्रवाशांसाठी या मार्गावर एकूण अवघे 81 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. या ठिकाणी 150 ते 200 पोलीस कर्मचार्यांची आवश्यकता आहे. परंतु या कमी मनुष्यबळामध्ये देखील येथील पोलीस कर्मचारी रेल्वे प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
नवी मुंबई वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील गोवंडी ते सिवूड आणि गोवंडी ते रबाळेपर्यंत 11 स्टेशन येत असून या 11 स्टेशन करिता 81 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. नवी मुंबई शहरात सिडकोच्या माध्यमातून अत्याधुनिक रेल्वे स्थानके उभारली गेली आहेत. या स्थानकात इतर कार्यालये देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे प्रवशांसोबत इतर नागरिक देखील रेल्वे स्थानकात ये-जा करत असतात. रेल्वेतील चोरी, हाणामारी, रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यातील सुरक्षा, रेल्वे अपघात इत्यादी रेल्वे सुरक्षिते करिता हे रेल्वे पोलीस कर्तव्य बजावत असतात. परंतु या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज लोकलच्या 600 फेर्या होतात आणि यामधून जवळजवळ 25 ते 26 लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे एवढ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमीत कमी 150 ते 200 रेल्वे पोलीस कर्मचार्यांची आवश्यकता आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने येथील रेल्वे पोलीस कर्मचारी त्या-त्या घटनाानुसार अपघात, चोरीची घटना किंवा अन्य घटनांच्या आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी प्राधान्य देऊन आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असतात.
परंतु या सर्वांमध्ये दुसर्या ठिकाणी सुरक्षा देताना इतर ठिकाणी सुरक्षा इकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. सन 2008 साली दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात हल्ला केल्यानंतर शहरातील सर्वच मुख्य स्थानकांमध्ये बंकर आणि मेटल डिटेक्टर ठेवण्यात आले होते. वाशी रेल्वे स्थानकात देखील बंकर ठेवण्यात आलेले आहेत. मात्र या ठिकाणी त्या बंकर मध्ये एकही रेल्वे पोलीस कर्मचारी निदर्शनास येत नाही. त्यामुळे या तोकड्या मनुष्यबरळाचा गैरफायदा घेत पुन्हा कोणत्या आपत्तीजनक घटना घडल्या तर? दहशतवादी हल्ला झाला तर? याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कडी सुरक्षा असणे गरजेचे आहे, असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.