वेश्‍वी येथे ओपन जिम, बालउद्यानाचे उद्घाटन

तरुणांच्या एकोप्यामुळेच वेश्‍वीचा विकास; आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वेश्‍वी ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केला असून या गावातील तरुणांनी एकोपा ठेवल्यामुळेच येथील विकास होऊ शकला, असल्याचे गौरवोद्गार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी काढले. वेश्‍वी येथे ओपन जिम आणि बालउद्यानाचे उद्घाटन आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, पंचायत समितीच्या उपसभापती मिनल माळी, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, सरपंच आरती पाटील, अजित माळी आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की, वेश्‍वीमध्ये मुली व मुलांसाठी अद्यावत व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधी आमदार निधीतून देण्याचा मानस आहे. गावासाठी तरुण एकत्र येतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. गाव एकत्र राहिले, गावातील तरुण एकत्र राहिले की, गावाचा विकास कसा होतो, हे प्रफुल्ल पाटील यांनी दाखवून दिले आहे. गावात तरुणांची चांगली टीम उभी करु. तसेच भविष्यात गावाचा विकास करु, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

गावठाण पाच मधील विकासकामे दोनमध्ये आपल्या प्रयत्नाने आणली. भविष्यात होणार्‍या तिसर्‍या मुंबईमध्ये गावठाणात चार एफएसआय मिळाले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेत सातत्याने केली आहे. त्यावर अद्यापही नकारात्मक उत्तर मिळालेले नाही. आमदार म्हणून गावठाणापासून 200 मीटरवरुन 500 मीटर हद्द वाढवली. सातत्याने अलिबागच्या दोन-तीन गावांसाठी गावठाण विस्तार मागून घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रभावशाली काम केले. एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केला; तर विधी मंडळात आपण धोरणे, कायदे बदलू शकतो, अशी अनेक उदाहरणे 22 वर्षाच्या विधीमंडळाच्या कारर्किदीत केली असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.

वेश्‍वी तलावाच्या सुशोभीकरणासाठी 8 कोटींचा निधी आणणार असल्याचे सांगत मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक बनविला जाईल असे ते म्हणाले. पंचायत हद्दीत कुठलेच काम शिल्लक राहणार नाही. स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी जलपाडाहून वेश्‍वी मार्गे थेट लाईन वावे येथे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या पाण्याच्या लाईनपुरता बोगदा करण्याची मागणी केली आहे. ते पुर्ण झाले तर पाणी पुरवठा होईल आणि वनखात्याचा देखील अडथळा राहणार नाही. तसेच या विभागाला एमआयडीसीचे शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल. तळागाळापर्यंत आपण पाणी पोहचवू.

उसरच्या वाढीव प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करणार असाल, तरच हा प्रकल्प करुन देण्याची अट ठेवली आहे. परिसरामध्ये पाणी आले तर वेश्‍वीचे उत्पन्न दुप्पटीने वाढू शकेल. प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजनपूर्वक झालेली वेश्‍वीतील कामे कौतुकास्पद असल्याचा गौरव आ. जयंत पाटील यांनी यावेळी केला.

झिराड ग्र्रामपंचायतीचे काम देखील कौतुकास्पद आहे. असेच एकत्र काम केले तर अजून वेगळ्या पद्धतीचा विकास करु. तरुणांची एकत्रित बैठक घेऊन व्यक्तिमत्व विकासावर जोर दिला जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Exit mobile version