रोह्यात सह्याद्री सहकारी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन

| रोहा | प्रतिनिधी |

रोह्यात सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रोहा शाखेचे उद्घाटन शनिवारी दिमाखात पार पडले. याप्रसंगी सर्वपक्षीय नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र आली होती. माजी आमदार लोकनेते स्वर्गीय अशोक साबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात वलय तयार केले आहे. स्व. अशोकदादा साबळे यांनी या सहकार चळवळीतून अनेकांना रोजगार दिला. रोहा शहरात सुरू होणारी शाखा म्हणजे तालुक्यातील सहकाराच्या लौकिकात भर पडेल, असा विश्वास खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री पतसंस्थेच्या सातव्या शाखेचे उद्घाटन रोह्यात खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन ॲड. राजीव साबळे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख समीर शेडगे, कमल नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे, विनोद पाशीलकर, विजयराव मोरे, ॲड. हेमंत गांगल, लालताप्रसाद कुशवाह, शहर प्रमुख दीपक तेंडुलकर आदी मान्यवरांसह सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह रोहा व माणगाव तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले. व्हाईस चेअरमन चंद्रशेखर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version