वाणदेत सभामंडपाचे लोकार्पण

आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीमधून 15 लाखांचा निधी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीमधून 15 लाख रुपये खर्च करून वाणदे येथे बांधण्यात आलेल्या सामाजिक सभामंडपाचे उद्घाटन माजी आ. पंडित पाटील व रायगड जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शेकाप रायगड जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील, माजी सरपंच विजय गिदी, माजी सभापती चंद्रकांत कमाने, माजी सरपंच रमेश दिवेकर, मुरुड तालुका उपाध्यक्ष राहील कडू, अमोल मिठाग्री, रामचंद्र दिवेकर, जयंत कासार, अमोल पाटील, रामचंद्र पाटील, नंदकुमार ठाकूर, अनंत ठाकूर, श्रीकांत वारगे, राजेश दिवेकर, प्रदीप दिवेकर, दत्ता पाटील, किरण पाटील, युवा शेकाप सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मंडळी वाणदे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंडित पाटील यांनी सांगितले की, वाणदे गावाची एकजूट असल्याने व फार पूर्वीपासून हे गाव शेकापसोबत असल्याने येथे विविध विकासकामांसाठी मोठा निधी वितरित करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागाचा विकास करण्यावर अधिक भर देणारा पक्ष आहे. आज लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी असंख्य गावांना पाणीपुरवठा योजना राबवल्या आहेत. ग्रामीण भागाचा विकास हा शेतकरी कामगार पक्षामुळे झाला आहे. वाणदे गावासाठी आवश्यक विविध लोकाभिमुख योजना यापुढेसुद्धा राबवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, वाणदे गावासारखी एकी कुठेच पहावयास मिळणार नाही. सदरच्या गावाने शेकापच्या सर्व दिग्गज मान्यवरांच्या हाताशी काम केले आहे. लोकांना अपेक्षित अशा विकासकामांवर आम्ही यापुढे भर देणार असून, लोकांचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रामस्थांना कशाची कमतरता असेल अथवा कोणतेही काम असेल तर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

शेकापचे ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आमदार जयंत पाटील यांच्या निधीमधून सभामंडपाचे काम पूर्ण झाले. तसेच ग्रामस्थ मंडळ यांनी मंदिराचे काम पूर्ण केले आहे. या परिसरात वाणदे ग्रामस्थांनी मेहनत घेतल्याने या पंचक्रोशीत भव्य दिव्य मंदिर उभे राहू शकले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भगत, तर आभार तुकाराम पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version