। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
अलिबाग मधील समुद्रात पोहत असताना एक पर्यटक पाण्यात बुडत होता. किनाऱ्यावरील असलेल्या जीवरक्षकाने त्याला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी घडली. पुणे येथील शाहरुख शेख असे या पर्यटकाचे नाव आहे. तो अलिबागमध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तो समुद्रामध्ये पोहत होता. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. किनाऱ्यावर असलेल्या कुणाल सारंग, प्रथमेश सारंग, महेश पाटील, निलेश कामतेकर या जीवरक्षकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता सुरक्षेचे साहित्य घेऊन समुद्रात उडी घेतली. पर्यटकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न ते करत होते. अखेर पाण्यामध्ये बुडत असलेल्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे जीवरक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







