घटना त्रिपुरात पडसाद महाराष्ट्रातात का?

गृहमंत्र्यांची विचारणा,शांततेचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी |
त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा काढण्यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने शनिवारी अमरावती बंदचे आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील इतवारा भागात आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, त्रिपुरामध्ये घटना घडली. त्यासाठी महाराष्ट्रात आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती,अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यानी दिली आहे.
या पार्श्‍वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अमरावतीत शांतता प्रस्थापित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शांतता निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी मदत करावी. समाजात द्वेष निर्माण करण्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
अमरावतीतील परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आपण विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोशल मीडियातून मेसेज फिरत आहे. या माध्यमातून सामाजिक द्वेष पसरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोणीही कायदा हातात घेऊ नये.लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सांगण्यात आले आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटले आहे.चॅनल्सनी वार्तांकन करताना जी दृश्य दाखवताय, ती चित्र दाखवताना वेळही नमूद करावी असे गृहमंत्री म्हणाले. कोणालाही आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. निवेदन देण्यापुरता परवानगी होती असे वळसे-पाटील यांनी सांगितलं.


राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. संयम बाळगावा जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले असून या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावेय
दिलीप वळसे पाटील,गृहमंत्री

मालेगावात तणाव
त्रिपुरा येथे मुस्लीम समाजातील नागरिकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावात पाळण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. यावेळी समाजकंटकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या प्रकारामुळे शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सुन्नी जमेतुल उलमा, रजा केडमी आदी संघटनांनी बंदची हाक दिली होती. शहरातील पूर्व भागात शांततेत बंद पाळण्यात आला होता. मात्र दुपारनंतर काही तरूणांच्या जमावाने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील दुकानांवर दगडफेक करीत दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे व्यापार्‍यांमध्ये घबराट पसरली होती.
झा अकादमीचा संबंध नाही
राज्यातील काही भागात हिंसाचार झाला आहे. त्याच्याशी रझा अकादमीचा संबंध नाही. आम्ही शांततेत बंद करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, तरीही हिंसा घडली. या मागे कोण आहे हे माहीत नाही. केवळ राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी हे सर्व प्रकार सुरू असून दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

Exit mobile version