गृहमंत्री वळसे पाटील यांची घोषणा; विरोधकांना सडेतोड उत्तर
| मुंबई | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आरोप करणार्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी यानी सादर केलेल्या कथित व्हीडीओ पेनड्राईव्ह स्टींग ऑपरेशन प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधीमंडळात केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहखात्यावरील चर्चेला उत्तर देताना वळसे पाटील यांनी विरोधकांच्या प्रत्येक आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गिरीष महाजन यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करत एक पेन ड्राईव्ह विधीमंडळात सादर केला होता. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आरोपांना उत्तर दिलं. या स्टिंग ऑपरेशनवरबद्दल बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, तुमचा आरोप काहीही असला तरी मी कुणाची पाठाराखण करणार नाही. मी तपासेल की, या मागे कोण आहे, दोषी कोण आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची? हे आपण पाहणार आहोत.असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांची डिटेक्टिव्ह एजन्सी
फडणवीसांनी मागेही एक पेन ड्राईव्ह दिला होता, दोन दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह दिला, आज पून्हा एक पेन ड्राईव्ह दिला. आपण एक डिटेक्टीव्ह एजन्सी तयार केली की काय? असा सवाल वळसे पाटलांनी केला. तसंच प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा दिला असून, सरकारने तो मान्य केला आहे. तसंच या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवत असल्याचं गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितलं.
2019 रोजी रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदाच्या 5,297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, याच्या नेमणुका देणं बाकी आहे. पण येत्या काही काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर दुसर्या टप्प्यात 7,231 पोलिसांची भरती करण्यात येईल. याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री