। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा परिसरात दिवसागणिक चोरीच्या घटना वाढत आहेत. याकामी पोलीस प्रशासन सजगतेने काम करीत असले तरीही, अधिकाधिक प्रभावी उपायायोजना करण्यात येण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहा परिसरात दोन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना नमूद करण्यात आल्या आहेत. यापैकी पहिल्या घटनेत, मोटारसायकल वाहनाची चोरी झाली आहे.
या घटनेतील अधिकच्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ताब्यातील (क्र. एमएच.06.सीसी.4885) मोटारसायकल आंबेवाडी गावातील सरकारी दवाखान्यानजीकच्या समर्थ कृपा चिकन सेंटर समोर लावून ठेवली होती. मात्र, यावेळी ते वाहनाची चावी काढून घेण्यास विसरले. याचाच फायदा उचलत एका अज्ञात चोरट्याने या वाहनाची चोरी केली.
दाखल तक्रारीनुसार या वाहनाची किंमत 40 हजार इतके असून, याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय दुसर्या घटनेत एका घरातून 18 हजार 300 रूपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची नोंदी नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अधिकच्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेतपळीस येथील राहत्या घरातून एका अज्ञात चोरट्याने रोख रक्कम, सोन्याची माळ, चांदीच्या बांगड्या आणि नादुरूस्त मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला आहे.
दोन्ही प्रकरणातील अधिक तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.