नवी मुंबई महापालिकेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 2000 मध्ये सी-टेक आधुनिक प्रणालीचा वापर करून ‘सीव्हरेज ट्रीटमेंट प्लांट’ (एसटीपी) आठ ठिकाणी उभारण्यात आले होते. या एसटीपीच्या माध्यमातून शहरात निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे शुद्ध पाणी खाडीमध्ये सोडण्यात येत होते. तर, काही प्रमाणात सोसायटी आणि शहरातील उद्यानांनाही हे पाणी वापरले जात होते. मात्र या प्रक्रियायुक्त पाण्याचा वेगळा वापर व्हावा, या विचारातून एसटीपीचा पुढील टप्पा म्हणजेच टर्शरी ट्रीटमेंट प्लांट (टीटीपी) महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे आणि ऐरोली येथे कार्यान्वित करण्यात आले आहेत. तीन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर यातील फेरप्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीमधील कारखान्यांना पुरवले जात आहे. त्यानुसार, आता पूर्ण क्षमतेने या ‘टर्शरी प्लांट’ मधील पाणी कारखान्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. हे पाणी विकून महापालिकेला पुढील 15 वर्षांत 494 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.
महापालिकेच्या घणसोली पामबीच मार्गावरील उद्यानांसाठी या टर्शरी प्लांटमधील फेरप्रक्रिया केलेल्या एक एमएलडी पाण्याचा वापर आधीच होत आहे. या टीटीपी केंद्रामध्ये एसटीपीकडून आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शुद्ध केले जाते. नवी मुंबईमध्ये टीटीपी प्रकल्प सुरू करण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केला होता.
2000 मध्ये आधुनिक सीटेक तंत्रज्ञानाची एसटीपी केंद्रे उभी राहिली आहेत. या एसटीपी केंद्रांमध्ये प्रक्रिया केलेले पाणी एनआरआय गृहसंकुल, शहरातील बागबगीचे यांच्यासाठी वापरण्यात येते. शहराची पुढील 30 वर्षांची अपेक्षित लोकसंख्यावाढ विचारात घेऊन तयार होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी केंद्रे सक्षम आहेत. यानंतर आता केंद्र सरकारच्या अमृत मिशन योजनेअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रत्येकी 20 एमएलडी क्षमतेचे दोन टीटीपी प्रकल्प ऐरोली आणि कोपरखैरणे येथे उभे राहिले आहेत. आता या टीटीपी केंद्रांमधून प्रक्रिया केलेले पाच एमएलडी पाणी उद्योगधंद्यांना पुरवले जात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याची बचत होत असून फेरप्रक्रिया केलेल्या पाण्याचा योग्य वापर होत आहे.