उत्तर महाराष्ट्रात 32 ठिकाणी आयकर विभागाचे छापे; 240 कोटींची संपत्ती जप्त

। नाशिक । वृत्तसंस्था ।
उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाला अक्षरशः काळी मायेचे घबाड सापडले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकूण 175 अधिकार्‍यांनी तब्बल 32 ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी सापडलेला पैसा 12 तास मोजला आणि संपत्तीची एकूण मोजणी करायला तब्बल 5 दिवस लागले. येणार्‍या काळात हे कारवाई सत्र पुन्हा वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बडे मासे अस्वस्थ झाले असल्याची चर्चा सुरू आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाईत जवळपास 240 कोटींची संपत्ती सापडल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यात सहा कोटींची रोकड होती. हा पैसा मोजायला बारा तास लागले. सोबत पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात मौल्यवान रत्नांच्या अंगठ्या, हिरे अशी मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. विशेषतः सोन्याच्या बिस्कटांचे प्रमाण मोठे होते.


याप्रकरणातील अनेक मोठे मासे अजूनही रडावर असून, त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या कारवाईने ऐन थंडीत ज्यांनी काळापैसा जमा केलाय त्यांना घाम फोडला आहे. उत्तर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली कारवाई सध्या कुतुहलाचा विषय झाली आहे. इतकी मोठी कारवाई तब्बल पाच दिवस चालली. मात्र, त्याची साधी खबरही बाहेर आली नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version