कुरुळजवळ अपूर्ण रस्ता ठरतोय जीवघेणा

एमएसआयडीसीच्या कारभारावर अवधूत पाटील यांचा संताप

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या अलिबाग-सहाण बायपास रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका आता थेट वाहनचालक आणि प्रवाशांना बसू लागला आहे. कुरुळ परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या रस्त्यावरील धोकादायक स्थिती उघड झाली असून, संबंधित यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शेकापचे युवा नेते अवधूत पाटील यांनी एमएसआयडीसीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

अलिबाग-सहाण बायपास रस्ता हा कोट्यवधी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः कुरुळजवळील भागात रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याने वाहनचालकांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्यानंतर या समस्येची तीव्रता आणखी वाढली आहे. अपूर्ण रस्त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, वाहनांना या खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागत आहे. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. अनेकदा वाहनांना खड्ड्यांचा जबरदस्त धक्का बसत असून, वाहनांचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. तसेच अचानक खड्डे चुकविताना किंवा वाहनांवर नियंत्रण ठेवताना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय, काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा उंच रस्ता आणि त्यानंतर अचानक सुरू होणारा डांबरी रस्ता यामध्ये मोठी उंचीची तफावत असल्याने वाहने जोरात आदळत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यास ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता वाढली असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प असूनही कामातील संथगती, अपूर्णता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शेकापचे युवा नेते अवधूत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कुरुळ परिसरातील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, कुरुळ परिसरातील अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहनचालकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

Exit mobile version