गोशाला बांधण्याची मागणी
। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा नवीन पोसरी बाजार पेठेत मोकाट फिरणार्या गुरांची संख्या वाढल्याने या गुरांसाठी गोशाला बांधून तेथे गुरांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाच्या गोरक्षकांसह नागरिक करत आहेत.
नुकतेच बाजारपेठेत मोकाट गुरांमधील एक गाय चक्कर येऊन धडपडत चालत असल्याचे जनार्दन गायकवाड यांनी रसायनीचे गोरक्षक प्रमुख मल्लेश गुडसे व प्रशांत तांबोळी यांना सांगितले. यावेळी गोमाता रक्षकांनी पशुवैद्य डॉ. कोकरे यांना कळविले. परिस्थिती पाहता डॉक्टऱांनी गाय पडलेल्या ठिकाणी येऊन औषधोपचार सुरू केले. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, शिळे टाकलेल्या खरकट्यातून गुरांच्या पोटात हे अन्न गेल्याने त्यांना विषबाधा होऊ शकते. कधी-कधी खरकट्यासोबत प्लास्टीकही गुरांच्या पोटात जाते. डॉक्टरांनी सलाईन व इंजेक्शन देऊन गायीचा जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, गायीचा जीव वाचू शकला नाही. त्यातूनही अन्नविषबाधा होऊन मोकाट गुरांच्या जीवावर बेतले जात आहे. परिसरात मोकाट गुरे उघड्यावरचा कचरा खात असल्याने तसेच रहदारीच्या रस्त्यावर आपले बस्तान मांडत असल्याने जीव गमावत आहेत. गुरांना उघड्यावर सोडणार्या मालकांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी परिसरात जोर धरु लागली आहे.