| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील एका वकिलीचे शिक्षण पूर्ण करणार्या तरुणाचा बळी गेल्यानंतरदेखील नेरळ ग्रामपंचायत प्रशासन ठिकाणावर आले नाही. नेरळ गावातील आणखी चार डेंग्यूचे रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे नेरळ गावातील डेंग्यूचे डासांची साखळी तोडण्याचे काम नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सुरू आहे.
नेरळ गावातील जुनी बाजारपेठ भागातील तरुणाचा डेंग्यू झाल्याने मृत्यू झाला होता. हा वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेला तरुण नोकरीचे ठिकाणी नेरळ-मुंबई असा प्रवास करायचा. त्याला डेंग्यू झाल्याने नेरळ जुनी बाजारपेठमध्ये नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे किमान दोन हजार रहिवाशांची भेट घेऊन आरोग्य तपासणी केली होती. त्यावेळी त्या तरुणाचे आईवडील किंवा अन्य एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, त्यानंतर 15 दिवसांनी नेरळ गावातील जुनी बाजारपेठ, बोंबील आळी तसेच लोकमान्य टिळक चौक आणि सम्राटनगर अशा चार डेंग्यू झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, नेरळ गावातील डेंग्यूचे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात जुनी बाजारपेठ आणि बोंबील आळी परिसरातील पाणी साठवून ठेवलेल्या सर्व टाक्यांमध्ये तसेच इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साठवून ठेवलेल्या ठिकाणी डासांच्या अळी यांना रोखण्यासाठी अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. पाणी साठवून ठेवलेल्या प्रत्येक ठिकाणी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अळीनाशकांचा वापर करून डासांची साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव यांच्या मार्गदर्शनानुसार नेरळ गावातील डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेल्या भागात आरोग्य कर्मचारी यांच्याकडून सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी आसपासचे 50 घरांचे असे सर्वेक्षण सुरू असून, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डेंग्यूचे डासांची साखळी तोडण्यासाठी पाणी साठून राहिलेले ठिकाणी शोधण्याचे काम करीत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरव यांनी दिली.
नेरळ ग्रामपंचायतीकडून असहकार..
नेरळ गावात एकाच महिन्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत,त्यातील एका रुग्णाचा मृत्यू 13 सप्टेंबर रोजी झाला असून, प्राथमिक आरोग्य केंद्राने गावातील रहिवाशांसाठी नियमावली बनवून ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिली होती. त्या नियमावलीबद्दल जनजागृती करून गावातील डेंग्यूचे डास यांचे निर्मलून करण्याचा प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्देश होता. मात्र 15 दिवसांत तीनवेळा पत्र देऊनदेखील ग्रामपंचायतीकडून मागील 15 दिवसांत एकही फलक लावले गेले नाहीत किंवा रिक्षामधून दवंडीदेखील पिटविण्यात आली नाही .त्यामुळे नेरळ गावातील डेंग्यूचे रुग्ण वाढण्यास नेरळ ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असणार आहे. मात्र, उद्या सोमवारी नेरळ ग्रामपंचायत डेंग्यू बद्दल जनजागृती करणारे फलक लावले जातील, अशी माहिती ग्रामपंचायतीकडून मिळाली आहे.