तीस दिवसात 11 ठिकाणी आग लागण्याचे प्रकार
| पनवेल | प्रतिनिधी |
उन्हाच्या झळा वाढू लागताच नवी आगीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पनवेल परिसरात मागील तीस दिवसांत 11 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या असून, शॉर्ट सर्किटमुळे या आगी लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णता जाणवत आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. काही वेळा मोठ्या दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानीदेखील होते.
ग्रामीण तसेच शहरी भागांत या कालावधीत आग लागण्याचे प्रकार मोठ्या संख्येनं घडतात. पनवेल तालुक्यातील रिटघर गावात बुधवारी (दि.16) रात्री पावणे एकच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, घरातील सर्व सामान जळाले आहे. रात्रीची वेळ असल्याने घरातील वस्तू काढता आल्या नाहीत व आग भडकत राहिली. तरी ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. तत्पूर्वी, 13 नोव्हेंबर रोजी सानपाडा येथील इमारतीच्या 6 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत इमारतीमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर 10 नोव्हेंबर रोजी पळस्पा फाटा येथील इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागल्याचा प्रकार घडल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलाला अवघड गेले होते. उन्हाळ्यात हे प्रकार घडण्यामागं काही कारणं आहेत. यात शॉर्ट सर्किट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितलं जात उन्हाळ्यात इमारती, घरं, कारखान्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. उन्हाळ्यात अन्य घरांच्या तुलनेत स्लॅब आणि पत्र्याची घरं जास्त तापतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट, अधिक तापमान, गॅसगळती किंवा मानवी चुकीमुळे कागद, प्लॅस्टिकचं साहित्य, रसायनं आणि फर्निचर या गोष्टी पटकन पेट घेऊन आग लागण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी चिमणी तसेच अन्य उपकरणांचं वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करून घेणं आवश्यक आहे.
विजेचा वाढता वापर उन्हाळ्यात उष्णतेपासून दिलासा मिळावा, यासाठी बहुतांश लोक पंखे, एसी किंवा कूलरचा वापर करतात. यामुळे वीज यंत्रणेवर लोड वाढतो. त्यामुळे शॉर्ट सर्किट होते. शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना घडतात. शहरी भागात आग लागण्यामागं हे एक प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात वाहनांना आग लागण्याच्या घटनादेखील पाहायला मिळतात.
30 दिवसात घडलेल्या घटना
16 नोव्हेंबर- पनवेल तालुक्यातील रिटघर गावात घराला आग.
13 नोव्हेंबर- नवी मुंबई सानपाडा येथील इमारतीच्या 6 व्या मजळ्यावर आग.
10 नोव्हेंबर- पनवेल पळस्पा फाटा येथील इमारतीच्या 18 व्या मजळ्यावर आग.
01नोव्हेंबर- नवी मुंबई वाशी येथे कारला आग.
31 ऑक्टोबर- उरण येथील गोदामाला आग.
29 ऑक्टोबर- कामोठे येथील सेक्टर 19 अक्षर इमारतीच्या 14 व्या मजळ्यावर आग.
29 ऑक्टोबर- नवी मुंबई वाशी एपीएमसी मार्केट मध्ये उभ्या ट्रकला आग.
27 ऑक्टोबर- उरण येथील अनधिकृत भंगार गोदामाला आग.
26ऑक्टोबर- वाशी येथील बॉम्बे एन एक्स इमारतीच्या मीटर बॉक्सला आग.
26 ऑक्टोबर- वाशी टोल नाक्यावर चारचाकी वाहनाला आग.
16 ऑक्टोबर- महापे येथील 7 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 5 वाहनं खाक.