चालक-मालक संघटनेकडून सात वर्षांनी दरवाढ
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी नेरळ-माथेरान घाट रस्त्याने प्रवास करावा लागतो. गेली 50 वर्षे 330 प्रवासी टॅक्सी या घाटातून माथेरानला पोहोचण्यासाठी रात्रंदिवस सेवा देत आहे. मात्र, इंधनाचे वाढते दर लक्षात घेता तब्बल 7 वर्षांनी टॅक्सी संघटनेकडून टॅक्सीचे भाडे वाढवण्यात आले आहे.
ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नेरळ-माथेरान घाट हा एकमेव रस्ता मार्ग आहे. या रस्ता मार्गाने वर्षाकाठी लाखोच्या संख्येने पर्यटक प्रवास करतात. या पर्यटकांच्या सेवेसाठी नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक संघटना कार्यरत असून 330 प्रवासी टॅक्सी या मार्गावर विभागीय परिवहन विभागाच्या मान्यतेने चालत आहेत. ही प्रवासी संघटना पर्यटकांना 24 तास सेवा देत असून या मार्गावर आजपर्यंत कोणत्याही टॅक्सी चालकांकडून महिलांबाबत कोणतीही चुकीची घटना घडली नाही. सुखरूप प्रवास घडवून देणाऱ्या नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेकडून प्रति प्रवासी 100 रुपये तिकीट आकारले जात होते. तिकिटांचा हा दर कोरोना काळातदेखील वाढवण्यात आलेला नव्हता. इंधनाचा वाढलेला दर त्यात पेट्रोल, गॅस, इंजिन ऑईल, वाहनांचे वाढलेले स्पेअर पार्ट, वाढलेले इन्शुरन्सचे दर यामुळे नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने गेल्या सात वर्षपासून वाढलेले नव्हते ते प्रवासी दर वाढवण्याचे ठरवले आहे. नविन प्रवासी दर प्रति प्रवासी 120 रु आणि लहान मुलांना 60 रुपये राहतील आणि पुर्ण गाडीसाठी 600 रुपये दर लागु करण्यात येतील. सध्या स्थानिक गाववाल्यासाठी प्रवासी दर 100/ 50 रुपये आहे तोच राहील.
सात किलोमीटर लांबीचा हा घाटरस्ता देशातील अवघड वळणाच्या रस्त्यापैकी एक रस्ता समजला जातो. त्याचवेळी अखंडित सेवा देण्याचे कार्य या संघटनेकडून सुरू असून त्यांच्याकडून प्रवासी भाडे वाढ केली आहे. त्यात पूर्वीचे भाडे हे 100 होते ते आता 120 रुपये प्रति प्रवासी करण्यात आले आहे. तर लहान मुलांसाठी ही भाडे 50 वरून 60 रुपये प्रति प्रवासी असे करण्यात आले आहे. ही भाडेवाढ नेरळ-माथेरान चालक-मालक टॅक्सी संघटना यांच्याकडून अध्यक्ष रवींद्र मिसाळ आणि नरेश कराळे यांनी जाहीर केली आहे. प्रवासी वर्गाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून स्थानिक प्रवासी यांच्यासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
