रेल्वे मार्गावरील ताण वाढला

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

प्रवाशांमध्ये वाढ; वेळापत्रक सुधारणा, सुरक्षेची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील उरण-नेरूळ-बेलापूर रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत 23 लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला आहे. 2024 मध्ये ही संख्या 19 लाख होती. त्यामुळे एका वर्षात सुमारे 12 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू तसेच परिसरातील विविध विकास प्रकल्पांमुळे उरण, द्रोणागिरी, तारघर, गव्हाण व नेरूळ परिसरातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. या वाढत्या प्रवासीसंख्येमुळे रेल्वे मार्गावरचा ताणही वाढला आहे. प्रवाशांची वाढ लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने डिसेंबर 2025 पासून अप व डाऊन मार्गावर 10 नवीन लोकल फेऱ्या सुरू केल्या असून, तरघर आणि गव्हाण स्थानकांवर लोकल थांबे देण्यात आले आहेत. मात्र सध्याचे वेळापत्रक प्रवाशांच्या गरजांना अपुरे ठरत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत लोकल फेऱ्या एक तासाच्या अंतराने असल्याने प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. दुपारच्या वेळेत बेलापूर-नेरूळ मार्गावर एक ते दीड तास लोकल न मिळाल्याने नोकरदार, विद्यार्थी व महिलांची मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय रात्री 10.30 वाजता शेवटची लोकल असल्याने उशिरा प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, उरण परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या महागड्या वस्तूंची दमदाटी करून चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पर्स, दागिने आदी वस्तू चोरण्यात येत असून, रात्रीच्या वेळेत सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

मराठी पत्रकार संघाकडून विविध मागण्या
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. दुपारच्या वेळेत लोकल फेऱ्या अर्ध्या तासाच्या अंतराने सुरू कराव्यात, उरण स्थानकातून सीएसएमटी, ठाणे आणि पनवेलपर्यंत थेट वातानुकूलित लोकल सेवा लवकर सुरू करावी, तसेच नवी मुंबई ते उरण दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची शक्यता
रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळाशी होणारी जोडणी आणि भविष्यातील विकास प्रकल्प लक्षात घेता, या मार्गावरील प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सुरू केलेल्या नवीन फेऱ्यांमुळे मागील दोन वर्षांत सुमारे 42 लाख प्रवाशांचा प्रवास अधिक सुरळीत झाला असून, भविष्यात या मार्गावरील रेल्वे सेवा अधिक सुरक्षित, वेगवान आणि प्रवासीअनुकूल करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Exit mobile version