। उरण । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील नेरूळ ते उरण दरम्यानच्या रखडलेल्या रेल्वे मार्गातील खारकोपर ते उरण मार्गाच्या कामाला वेग आला असून या मार्गावरील रेल्वे मार्ग व स्थानकांची कामे जोमाने सुरू आहेत. यातील रांजणपाडा स्थानकावर छप्पर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गाचे काम डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 ला पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रखडलेल्या खारकोपर ते उरण काम सप्टेंबर महिन्यात पूर्ण करण्याचा निर्धार रेल्वे आणि सिडकोने केला होता; मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे हे पुन्हा रेंगाळले असले तरी सध्या या कामाने वेग धरला आहे.
या मार्गावरील रेल्वे स्थानक, मार्गाचे विद्युतीकरण यांची कामे सुरू झाली आहेत. नवी मुंबईच्याच विकासाचा एक भाग असलेल्या उरणला इतर शहरांशी जोडण्यासाठी नेरूळ ते उरण या 26.7 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाला 1997 ला मंजूरी देण्यात आली होती. यातील नेरूळ ते खारकोपर हा 12.4 किलोमीटरचा मार्ग कार्यान्वित झाला आहे. तर खारकोपर ते उरण हा 14.3 किलोमीटर च्या मार्गाचे काम भूसंपादन व वन विभागाच्या परवानगीमुळे रखडले होते. ते काम सुरू झाले आहे. या मार्गावर गव्हाण, जासई, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी व उरण या सहा स्थानिकांच्या उभारणीचे काम सुरू आहे.
2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न
हा प्रकल्प रेल्वे व सिडको यांच्या भागीदारीतून उभारण्यात येत आहे. मार्गाचा अपेक्षित खर्च काम रखडल्याने वाढला आहे. सुरुवातीला 1 हजार 768 कोटींचा असलेल्या खर्चात वाढ होऊन तो 2 हजार 980 कोटींवर पोहचला आहे. या भागीदारीच्या प्रकल्पाच्या उभारणीत निधीच्या कमतरतेमुळे ही काम लांबणीवर पडले होते. मात्र हे काम कोणत्याही परिस्थिती डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याच्या इराद्याने सध्या कामाला वेग आला आहे.
उरणच्या विकासाला गती
उरण हे ओएनजीसी, जेएनपीए बंदर, भारत पेट्रोलियम, वायू विद्युत केंद्र व बंदरावर आधारित उद्योग यामुळे राज्यातील मुख्य औद्योगिक केंद्र बनले आहे. त्याचप्रमाणे बंदरावर आधारित सेझसह अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. तर दुसरीकडे सिडकोच्या माध्यमातून नागरीकरण ही वेगाने सुरू असल्याने या परिसराला रेल्वे मार्गाची आवश्यकता आहे. त्यामुळे उरणला जोडणारा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास उरणच्या विकासाला वेग येणार आहे.