मुरूड समुद्रकिनारी भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

सीसीटीव्ही कॅमेरे बंद; स्टॉलधारक हैराण

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

मुरूड समुद्रकिनारी असणाऱ्या स्टॉलधारकांच्या साहित्याच्या चोऱ्यांचे सत्र काही दिवसांपासून सुरू झाले असून, चोरट्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरटे कोण असावेत याचा अंदाज बांधणे पोलिसांना कठीण जाणार आहे. यामुळे स्टॉलधारकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजी नगरसेवक बाळकृष्ण गोंजी यांनी सांगितले की, जियालाल यादव यांच्या खुर्च्या, आइसक्रीम विक्रेते हरिश्चंद्र फुलमाळी यांच्या खुर्च्या, परेश किल्लेकर यांचे तीन फॅन, टॉयलेट, वॉश रूम केअर टेकर बाळकृष्ण गोंजी यांचा मोठा प्लास्टिक पाईप आदी वस्तू अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहेत.

बाळकृष्ण गोंजी आणि स्टॉलधारकांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी सुमसाम झाल्यावर अज्ञात चोरटे आमच्या स्टॉलवरील वस्तू लंपास करीत असून, आम्ही चिंताग्रस्त झालो आहोत. पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असून, पर्यटकांच्या गाड्यादेखील असतात. असे चोरटे निर्ढावल्यास जबरी चोऱ्या करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. मुरूड पोलिसांनी या चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. सीसीटीव्ही कॅमेरेदेखील सुस्थितीत सुरू हवेत.

Exit mobile version