फटाक्यांच्या किमतींत वाढ

| पनवेल | वार्ताहर |

दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचा फटका बसला आहे. कारण विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किमतीमध्ये 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाल्याने यंदा दिवाळीत खिशाला झळ बसणार आहे.

आठवड्यावर आलेल्या दिवाळीच्या तयारीला वेग आला आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीन फुलल्या आहेत. यंदा नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच एकीकडे फटाके निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे; तर दुसरीकडे वाढलेली मजुरी, वाहतुकीचा वाढलेला खर्च, विजेचे दर या सर्व बाबींमुळे फटाक्यांच्या दरांमध्ये सरासरी 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ नफा ठेवूनच यंदा फटाके विकावे लागणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दिवाळीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फटाके फोडण्याचा मोह होतो. सध्या बाजारात ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी कमी आवाजाच्या फॅन्सी फटक्यांना अधिक मागणी आहे. त्यामुळे यंदा बाजारात रंगीबेरंगी कमी आवाजाचे आणि आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांना मागणी आहे. बाजारात अशा फटाक्यांचे हजारपेक्षाही अधिक प्रकार उपलब्ध आहेत.

Exit mobile version