रायगडात गिधाडांच्या संख्येत वाढ

गिधाड संवर्धनाचा सिस्केपचा जागर

| रायगड | सुयोग आंग्रे |

अन्न साखळीतील महत्वाचा घटक असणाऱ्या ‌‘गिधाड’ पक्षांची घट पर्यावरणाच्या समतोलाला बाधक ठरणारी आहे. रायगड जिल्ह्यातील जंगलांमधील कडेकपाऱ्यांमध्ये आपली कॉलनी उभारणाऱ्या गिधाडांची संख्या सिमेंटची जंगले आणि खाद्य पदार्थांमुळे घटल्याचे विदारक चित्र समोर आले होते. गिधाड संरक्षण संवर्धनाचा नारा देत सिस्केपने पुढाकार घेतला आहे. सिस्केपच्या प्रयत्नांमुळे गिधाडांचे पंख कॉलनी उभारण्यासाठी रायगडात झेपावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सिस्केप संस्थेने महाडसह माणगाव, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात गिधाड संवर्धनाबाबत जनजागृती केल्याने गिधाडांची संख्या जवळपास 400 च्या आसपास झाली आहे.

सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा आणि शनिवार हा दिवस जगामध्ये गिधाड पक्षाबद्दल जनजागृती आणि संवर्धन वाटचालीतील महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सिस्केप संस्था महाड, वनपरिक्षेत्र कार्यालय महाड आणि नाणेमाची, वाकी दहिवड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वाकी दहिवडी येथे गावकऱ्यांसमवेत आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन साजरा करण्यात आला. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल, पूर्वांचल आणि बंगाल येथून स्थलांतर करणारी स्थलांतरित गिधाडे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाड आणि रायगड परिसरात येतात. प्रदेशातील युरेशियन ग्रीफन व्हल्चर्स ही गिधाडे देखील आपल्या रायगड जिल्ह्यात नोंदवली गेली आहेत. ही गिधाडे दोन महिने तरी आपल्या रायगड जिल्ह्यात वास्तव्यास असतात. त्यांच्या नोंदी सिस्केप संस्थेच्या माध्यमातून वारंवार घेण्यात आली आहेत.

नामशेष होण्याची कारणे
गिधाडे हे पर्यावरण स्वच्छ करणारे सफाई कामगार असल्याने पर्यावरण संवर्धनात गिधाडांचे मोठे महत्त्व आहे. जंगलतोड, वाढती लोकसंख्या, शेतीतील दुग्ध व्यवसायात होणाऱ्या उत्पादनवाढीसाठी औषध प्रयोग व पर्यावरणाचा बिघडता समतोल यामुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील निष्कर्षानुसार, गिधाडांच्या जंगल निवासस्थानाचे नुकसान होत आहे. शिवाय नदी प्रदूषण, अन्न आणि पाण्याची उपलब्धता, आफ्रिका, चीन, मंगोलिया, दक्षिण अमेरिकासारख्या देशांत गिधाड शरीराच्या अवयवांचा अवैध व्यापार नोंद, हत्तीची तस्करी करणारी मंडळी विषप्रयोग करून त्यावर येणाऱ्या गिधाडांना ठार मारतात. आधुनिक विकसित तंत्रज्ञान पद्धती इलेक्ट्रोक्युशन आणि पवन टर्बाइन यांचाही गिधाडांच्या उड्डाण मार्गात अडथळा होतो आणि ते मृत्युमुखी पडतात. यामुळे गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
गिधाडांविषयी जनजागृती
रायगड जिल्ह्यात पांढऱ्या पाठीचे गिधाड, भारतीय लांब चोचीचे गिधाड या दोन प्रजातीची वीण होते. शिवाय काळे मोठे गिधाड, इजिप्शियन गिधाड, युरोपीय ग्रिफ्फन गिधाड आणि हिमालयीन ग्रिफोन गिधाड या प्रजाती हिवाळ्यात आपल्याकडे स्थलांतर करतात आणि काही काळ वास्तव्य करतात. गिधाडांची संख्येत वाढ होण्यासाठी त्यांचा अधिवास निश्चित करणे. पशुवैद्यकीय उपचारांमध्ये डायक्लोफेनाक सोडियमच्या वापरावर बंदी घालणे आणि जंगलातील गिधाडांच्या लोकसंख्येवर लक्ष ठेवणे, यासारखी विविध पावले सिस्केप संस्थेने तीन दशकात यशस्वी उचलली. अवघ्या 28 गिधाड संख्येवरून आणि दोन घरट्यावरून ही संख्या आज 84 घरटी नोंद आणि 347 वर गणसंख्या नोंदविण्यात आली होती. नव्याने होणाऱ्या गणनेत गिधाडांची संख्या 400 पर्यंत पोहचेल अशी आशा प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केली.

सिस्केप संस्थेकडून 28 वर्षे सातत्याने झालेले प्रयत्न आणि सातत्याने शास्त्रीय पद्धतीने केलेल्या संवर्धन पद्धतीमुळे गिधाडांच्या संख्येत वाढ झाली आहे. गिधाड जनजागृती दिनानिमित्ताने संस्थेकडून गिधाडांची घरटे करण्याची, नैसर्गिक स्थाने निश्चित करणे आणि नैसर्गिक अधिवास संरक्षित करून नैसर्गिक पद्धतीने गिधाडांचे रक्षण करण्याचे काम सुरू आहे. हॅबिटॅट रिपेअर अँड रिस्टोरेशन अशा पद्धतीचा प्रकल्प सिस्केप संस्थेच्या माध्यमातून गेल्या 28 वर्षे रायगड जिल्ह्यातील 34 देवरायांमधून नियोजित आहे. त्यापैकी आठ देवरायांमध्ये अशा पद्धतीचे वृक्ष लागवड आणि संगोपन करून पुन्हा ती देवराई पूर्वस्थितीत आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले गेले आहेत.

प्रेमसागर मेस्त्री,
अध्यक्ष, सिस्केप

Exit mobile version