। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील जनता दोन-तीन वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करीत असून महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भातशेतीला लागणार्या खतांसह सर्व प्रकारचे कीटक-तणनाशकांच्या किमती भरमसाट वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. येत्या काही दिवसांपासून खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. मात्र रासायनिक खत, कीटकनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पेणमधील शेतकरी खत, कीटकनाशके खरेदी करावी की नाही, याचा विचार करीत आहेत.
अलिबाग तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात खत, औषधे, तणनाशकेही लागतात; परंतु भातशेतीच्या उत्पादनापेक्षा खर्च मोठा होत आहे. मजुरीही वाढली असून अनेकदा मजुरांअभावी भात लावणी, कापणीस विलंब होतो. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यापुढे शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
वर्षभरापासून रासायनिक खतांच्या किमतींमध्ये सतत वाढ सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा अप्रत्यक्ष फटका भारताला बसला असून देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर जवळपास दुप्पट वाढले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने सध्या शेतकर्यांची बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. मात्र पेरणीनंतर लागणार्या खतांची भाववाढ पाहता शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरीप हंगामातील उत्पादनावर कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठीही औषध फवारणी महत्त्वाची आहेत.
खतांच्या कीटकनाशकाच्या किमतीत वाढ
