पोपटीसाठी आवश्यक मुख्य जिन्नस
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सध्या जिल्ह्यात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु झाली आहे. वालाच्या शेंगांबरोबरच या पोपटीसाठी सर्वात महत्त्वाचे जिन्नस म्हणजे भांबुर्डीचा पाला, त्यामुळे या पाल्याला मागणी वाढली आहे. मात्र, झपाट्याने होणारे नागरीकरण, वाढती कारखानदारी आदी कारणांमुळे या भांबुर्डीच्या पाल्याच्या संवर्धनाची गरज तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची वैशिष्ट्यपूर्ण व लज्जतदार पोपटी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी शेतावर या पोपटी पार्ट्यांची धूम पाहायला मिळते. वालाच्या शेंगां भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात. त्यामध्ये कांदा व बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढवली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. आणि भांबुर्डीच्या पाल्याशिवाय ती करणे शक्य नाही.
पाल्यामध्ये औषधी गुणधर्म
भांबुर्डीच्या पाल्याचे अनेक विषेश गुणधर्म आहेत. याला गोरखमुंडी, वसई-विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगडमध्ये भांबुर्डी किंवा भामरुड असे म्हणतात. पावसाळ्यानंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळराणात आदी ठिकाणी उगवतो. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यास पाल्याचा रस जखमेवर चोळल्यास ती निर्जंतुक व लवकर बरी होते. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने पाणी नसतानादेखील याच्या वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. याबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि लज्जतदार चवदेखील येते.
रस्ते बांधणी, खोदकाम, बांधकाम व वणवे आदि कारणांमुळे भांबुर्डीचे प्रमाण कमी होतांना दिसत आहे. काही ठिकाणी रानमोडीचा प्रादुर्भाव वाढल्यानेदेखील भांबुर्डी कमी होत आहे. बर्याचदा दूरवरून ती आणावी लागते. म्हणून तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
तुषार केळकर
कृषी तज्ज्ञ व पोपटी विशेषज्ञ, उद्धर-सुधागड







