गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व्यापार्यांकडून अधिकची बुकिंग
| हमरापूर | प्रतिनिधी |
पेणसह राज्यातील मूर्तिकारांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले असून, पीओपी गणेशमूर्तींनाच मागणी वाढली आहे. पेण शहरासह हमरापूर विभाग व तालुक्यात सर्वच ठिकाणी पीओपीच्या गणेशमूर्ती बनवल्या जातात. चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी गणेशमूर्ती निर्माण व्यवसायातील ग्राहक व्यापारी मूर्तींच्या मागणीची नोंदवितात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती घेण्याकडे एकंदरीतच ग्राहक व्यापारी यांचा कल आजही असल्याचे हमरापूर येथील गणेशमूर्तीकार कुणाल पाटील यांनी सांगितले.
पेणमध्ये तब्बल 30 ते 35 लाख गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. आता मागणी वाढल्याने कार्यशाळांमध्ये गणेशोत्सवापर्यंत उत्साहास भरते दिसून येणार आहे. राज्यासह केरळ, गुजरात, राज्यस्थान, गोवा व इतर राज्यांतून तसेच परदेशातून या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. झटपट वाहतूक व ग्राहकांना परवडणारी किंमत यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत व्यापारयांनी आपल्या मूर्तींची आताच बुकिंग करुन ठेवली आहे. येत्या चार महिन्यांत पेणसह राज्यभरातील इतर सर्वच ठिकाणी हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे गणेश मूर्तीकार संघटनेने राज्य अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी सांगितले. शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा पीओपीची गणेशमूर्ती ही वजनाने हलकी आणि मजबूत असते. ग्राहकांना मुर्ती सुखरुप घरी आल्याचेही समाधान मिळतं. त्यामुळे यंदाही गणेशभक्तांचा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल दिसून येतो आहे, असे कुणाल पाटील, मूर्तीकार व माजी अध्यक्ष गणेश मूर्तीकार संघटना हमरापूर विभाग यांनी सांगितले.