| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. मुख्य बाजारपेठ तसेच प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी 8 ते 10 कुत्र्यांचे टोळके दिसून येत असून, ते रस्त्यावर बसलेले किंवा मुक्तपणे फिरताना आढळतात. विशेषतः अचानक धावणारी लहान मुले किंवा ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काळात मोकाट कुत्रा चावल्याच्या सुमारे 50 हून अधिक घटना नोंदवण्यात आल्या असून या सर्व प्रकरणांची नोंद माथेरानमधील बी.जे. हॉस्पिटलमध्ये झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दर तीन वर्षांनी निर्बिजीकरण (स्टेरिलायझेशन) करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेला अनेकदा प्राणीमित्र संघटनांकडून विरोध केला जातो किंवा स्थानिक पातळीवर दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या मते कुत्र्यांवर होणाऱ्या कारवाईत मानवीय दृष्टिकोन राखला पाहिजे आणि कोणतीही कठोर उपाययोजना टाळली पाहिजे.
दुसरीकडे नागरिकांचा मुद्दा वेगळा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने आणि संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर प्राणीमित्र संघटनांनीही पुढाकार घेऊन निर्बिजीकरण मोहिमेत सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासन, प्राणीसंघटना आणि नागरिक यांच्यात समन्वय साधूनच या समस्येवर तोडगा निघू शकतो. अन्यथा भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.





