शेतकऱ्याच्या बकऱ्या केल्या फस्त
| महाड | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून किल्ले रायगड परिसरामध्ये बिबट्याचा संचार वाढल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. हा बिबट्या मानवी वस्तीच्या परिसरात फिरत असून, रविवारी रात्री नांदगाव बुद्रुक गावामध्ये तीन बकऱ्यांचा फडशा पाडला आहे.
किल्ले रायगड परिसरामध्ये शनिवारी एका शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर रविवारी रात्री नांदगाव बुद्रुक गावामध्ये बिबट्याने विजय जाधव या शेतकऱ्याच्या तीन बकऱ्या मारून टाकल्या. बकऱ्यांच्या आवाजाने ग्रामस्थ जागे झाले आणि हा बिबट्या पळून गेला. मात्र, या शेतकऱ्याचे नुकसान झाले असून, याबाबत महाड वनविभागाला कळविण्यात आले आहे. महाड वनविभागाच्या रायगड विभागीय कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला आहे. तसेच, विजय जाधव या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.