नागावमध्ये ‌‘इंडिया’च्या उमेदवारांना वाढता पाठिंबा

| चौल | प्रतिनिधी |

नागाव ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीचे वातावरण गावागावात तापू लागले आहे. नशीब अजमावण्यासाठी व सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते शास्त्रीनगर येथील गणेश मंदिरात नुकताच इंडिया आघाडीच्या प्रभाग क्र.5 मधील उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फुटला असून, त्यानंतर भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दरम्यान, अर्ज मागे घेतल्यानंतर खरे उमेदवार स्पष्ट झाले. प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर उमेदवार प्रचाराला गती देताना दिसून येत असून, मतदारांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.5 मधून विद्यमान सरपंच निखिल नंदकुमार मयेकर, माजी उपसरपंच संदेश लक्ष्मण नाईक, सुप्रिया (मीना) संजय म्हात्रे हे उमेदवार सदस्यपदासाठी, तर थेट सरपंचपदासाठी हर्षदा निखिल मयेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत पक्षाच्या माध्यमातून नागावमध्ये विविध विकासकामे करण्यात आल्याने मतदारांचा इंडिया आघाडीच्या उमेदवारांचे पारडे जड असून, आपल्या मनातील उमेदवार म्हणून त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

सध्या गावागावात मतदारांच्या भेटीगाठींना वेग आला असून, कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. प्रचाराचा नारळ फुटल्यापासून कार्यकर्ते सकाळी व सायंकाळी उमेदवरांसह प्रचार करताना पहावयास मिळत आहेत. दिवसेंदिवस प्रचाराला उमेदवार गती देताना दिसून येत असून, मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता पहावयास मिळत आहे. त्यामुळे गावागावात आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रंगत वाढली आहे. तरी, इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन नंदकुमार मयेकर यांनी प्रचारादरम्यान केले आहे.

Exit mobile version