। नवीन पनवेल । वार्ताहर ।
कामोठेतील एका सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील वॉर्डबॉयने एका 18 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील 27 वर्षीय वॉर्ड बॉयविरोधात पॉक्सोसह लैंगिक चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पनवेलमध्ये राहणारा पीडित मुलगा आपल्या आईला कामोठे येथील एका खासगी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आला होता. रात्रीच्या वेळी आपल्या आईची देखभाल करण्यासाठी तो रुग्णालयामध्येच थांबला होता. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगा झोपला होता. याचा फायदा घेत वॉर्ड बॉयने मुलाचे कपडे काढून त्याच्यासोबत अश्लील व लैंगिक चाळे केले. या प्रकारानंतर जाग आल्यानंतर त्याने वॉर्ड बॉयला विरोध केला. त्यानंतर त्याने आपल्या आई-वडिलांना सर्व माहिती कळवल्यानंतर कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार या प्रकरणातील वॉर्ड बॉयविरोधात पॉक्सोसह लैंगिक चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली आहे.