मृत्यूला एक महिना होऊनही अद्याप गुन्हा दाखल नाही
| नेरळ | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील तांबडी गावातील नऊ वर्षांच्या खुशबू नामदेव ठाकरे या चौथीमध्ये शिक्षण घेत असल्याच्या विद्यार्थिनीचा संशयास्पदरित्या चुकीची औषधे दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, या कालावधीत शासकीय आश्रमशाळा आणि आरोग्य विभाग यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई शासनाने केलेली नाही. दरम्यान, शासनाचे घटक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असून, एक महिन्यानंतरदेखील संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी खुशबूच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली असून, पुढे पेण पोलीस ठाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहेत की नाही, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
बोरगाव ग्रामपंचायतीमधील तांबडी येथील खुशबू ठाकरे हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले. त्यानंतर तिला कुष्ठरोगावरील औषधे दिली गेल्यावर त्या औषधांचे साइड इफेक्ट खुशबुच्या अंगावर दिसून लागले होते. 18 डिसेंबर रोजी कुष्ठरोगावरील औषधे देण्यास सुरुवात झाली आणि काही दिवसांनी ताप येणे, अंगावर फोडी येणे, अंग सुजणे आदी प्रकार दिसून येऊ लागले आणि नंतर 22 जानेवारी रोजी खुशबूचा मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभर या प्रकरणाची नोंद जाहीर कुठेही झाली नव्हती, मात्र प्रसार माध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढले आणि खुशबू मृत्यू प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर पेण पोलीस ठाण्यात वरवणे शासकीय आश्रमशाळेतील खुशबू नामदेव ठाकरे या नऊ वर्षाच्या मुलीच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये दाखल झालेल्या या आकस्मिक मृत्यूप्रकरणी पोलिसांनी जाबजबाब घेतले, मात्र त्या बदलाचा गुन्हा दाखल व्हायला एक महिन्याचा कालावधी लागला आहे.
दुसरीकड़े खुशबूला कुष्ठरोगी ठरवल्यावर आरोग्य विभागाने तिची बायप्सी करण्याची गरज आरोग्य विभागाला का भासली नाही, असा प्रश्न संतोष ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. संतोष ठाकूर यांनी याप्रकरणी सरकार आपल्या अधिकारी, कर्मचारी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. खुशबूच्या मृत्यूला दोन महिने झाले तरी शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यपक, अधीक्षक,प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य विभागावर कारवाई करण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला असून शासनाच्या अशा भूमिकेमुळे शासकीय आश्रमशाळेवरील आदिवासी लोकांचा विश्वास उडण्याची शक्यता अधिक आहे. कदाचित आदिवासी समाजातील लोक आपल्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत निवासी शिक्षण घेण्यासाठी पाठवणारदेखील नाहीत, अशी भीती आदिवासी लोक व्यक्त करीत असल्याचे संतोष ठाकूर यांनी मत मांडले आहे.
खुशबू ठाकूर या चिमुरडीचा मृत्यू चुकीच्या औषधे दिल्याने झाला आहे, असे आपले ठाम मत आहे. त्यामुळे शासनाने अधिक वेळ न घेता या प्रकरणी आदिवासी आश्रमशाळा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून झालेला हलगर्जीपणा यांचा विचार करून तात्काळ कारवाई करावी आणि जनतेच्या मनात निर्माण झालेला असहकाराची भावना कमी करण्याचा प्रयत्न करावा.
संतोष ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते, पेण
आम्ही शासनाला लेखी पत्र देऊन आदिवासी विकास विभागाने खुशबू मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शासन या महिन्याच्या अखेरपर्यंत खुशबुच्या मारेकर्यांवर गुन्हा दाखल करून अटक करणार नसेल तर मार्च महिन्याची आमची संस्था पेण येथे प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसेल असा इशारा देत आहोत.
जैतू पारधी,
अध्यक्ष, जनजागृती आदिवासी विकास संस्था