। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेमध्ये काम करणारे कर्मचारी हे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी 5 मार्चपासून कामबंद आंदोलन करणार आहेत. पालिकेला अनेक वर्षे आपल्या मागण्यांचे निवेदन देत असून पालिका केवळ आश्वासने देत आहेत. त्यामुळे कामगारांची म्युनिसिपल कामगार युनियनच्या माध्यमातून आंदोलन केले जाणार असून कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत नगर परिषदेतील कामगारांनी आपल्या प्रश्नांवर पालिका मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासनाबरोबर सातत्याने चर्चा केली आहे. या प्रलंबित प्रश्नावर रीतसर चर्चा करण्याकरिता अनेकवेळा तोंडी आणि लेखी स्वरूपात मागणी करूनसुद्धा चर्चा होऊ शकली नाही. या चर्चेतून काही प्रश्न सुटू शकले असते. परंतु, तसे न झाल्यामुळे कामगारांचे बहुतांश प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगार कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.