। पुणे । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सिटी कार्पोरेशन कंपनीचे मालक अनिरुद्ध देशपांडे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या मध्ये 2019 मध्ये करार करण्यात आला होता. या कराराप्रमाणे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे प्रायोजक म्हणून सिटी कार्पोरेशनने जबाबदारी घेतली होती. मात्र, स्पर्धेच्या खर्चाचा तपशील नीट मांडला नसून, यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, हिंद केसरी योगेश दोडके यांनी केला आहे.
नेहरु स्टेडिअम येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यालयाबाहेरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी झालेल्या कराराची प्रत मिळावी, यासाठी भोंडवे यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. स्पर्धेचा सर्व खर्च करणे, खेळाडूंना चांगली रोख रक्कमेची बक्षीस देणे आणि कुस्तीगीर परिषदेस प्रत्येक वर्षी 15 लाख रुपये रॉयल्टी देणे, असे मुद्दे समाविष्ट असल्याची तोंडी माहिती सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी कुस्तीगीर परिषदेच्या सभासदांना दिली होती, परंतु कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये करानाम्यातील मुद्यांचे वाचन करण्यात आले नाही किंवा हरकतीवर चर्चा करण्यात आली नाही असे संदीप भोंडवे यांनी म्हटले आहे. लांडगे यांनी सिटी कार्पोरेशन कंपनी मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या सोबत करारनामा करून महाराष्ट्र शासनाकडून 42 लाख 18 हजार रुपये लाटल्याचा आरोपही भोंडवे यांनी यावेळी केला.