देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्यावर येणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
वाहने इथेनॉलवरही धावू शकतील. इथेनॉलमिश्रित इंधन हे पेट्रोलमध्ये मिसळून तयार होते. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकते. परिणामी, पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्यावर येतील, असा विश्वास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना, गडकरी म्हणाले की, सरकार 100 टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल 20 टक्के मिसळले जाते, ज्यामुळे ते मिश्रित इंधन बनते आणि ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे.
वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालतील
या आठवड्यात सर्व प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यांनी मला आश्वासन दिले, की ते एकापेक्षा जास्त इंधनावर चालणार्या वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करतील. त्यामुळे लवकरच भारतातील बहुतांश वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत आहे. आपले स्वप्न लवकरच साकार होईल असा विश्वास आहे. – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री