माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
माजी आ. पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| पेझारी | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोकण एज्युकेशन सोसायटीच्या ना.ना. पाटील संकुलामध्ये कोएसोचे ज्येष्ठ संचालक पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मीनाक्षी पाटील यांचेही हे अमृत महोत्सवी वर्ष! येत्या 13 सप्टेंबर 2022 रोजी मीनाक्षी पाटील यांना 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेझीम पथक व एनसीसी कमांडर समाधान भंडारे यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर संगीत शिक्षक राजेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथकाने राष्ट्रगीत, ध्वज प्रतिज्ञा व ध्वजगीत सादर केले. यानंतर पूजा पाटील या विद्यार्थिनीने कलापथकाच्या साथीने देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी सामाजिक क्षेत्रातील भारतभूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ‘बेस्ट अंगणवाडी सेविका’ जिविता पाटील यांचा झेप फाऊंडेशनच्या वतीने, मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बारिया प्राथमिक शाळा (मार्गदर्शक प्रगती सिंगासणे) व ना.ना. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोयनाड (मार्गदर्शक देवेंद्र पाटील) यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘देश रंगीला’ हे नृत्य अतिशय आकर्षक ठरले. त्यानंतर आंबेपूर ग्रामपंचायतीच्या वतीने शालांत परीक्षा दहावी व बारावी मार्च 2022 चे सर्वाधिक गुण मिळविणारे प्रथम तीन मानकरी यांचा सत्कार तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत संपन्न झालेल्या भाषण, निबंध, गायन, चित्रकला, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिसांचे वाचन सुवर्णा पाटील व प्रिया पाटील यांनी केले. यानंतर संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोलताशापथकाने सादर केलेली प्रात्यक्षिके विशेष कौतुकास प्राप्त ठरली. या ढोल ताशा पथकासाठी आंबेपूर सरपंच सुमना पाटील यांनी पंचवीस हजार रुपये तर उद्योजक सुरेश म्हात्रे यांनी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले.
याप्रसंगी माजी जि.प. सदस्या भावना पाटील, माजी पं.स. सभापती प्रमोद ठाकूर, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, युवा नेते सवाई पाटील, सुरेश म्हात्रे, को.ए.सो.सहमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, स्वप्नील पाटील, शशिकांत पाटील, मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे सर्व सदस्य, पोयनाड पंचक्रोशीतील प्रतिष्ठित सामाजिक राजकीय कार्यकर्ते, संकुल प्रमुख कमलाकर फडतरे, डॉ. दिलीप पाटील, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, आर.एस.पी., एन. सी. सी., गाईड, ढोल ताशा पथक ,संगीत कलापथक लेझीम पथक तसेच त्यांचे मार्गदर्शक संजय डोंगरे, संध्या खरसंबळे, राजेंद्र म्हात्रे, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी वंदे मातरम् या मंगलकामानेसह कार्यक्रमाचा शेवट झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.