। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीज हेही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. दोघेही कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाचा आनंद लुटतील. ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओफफेरल म्हणाले, क्रिकेट ही दोन देशांना जोडणारी एक गोष्ट आहे. अहमदाबादमध्ये सामन्याच्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना सामना बघताना पाहणे खूप आनंददायी ठरेल.
चौथी कसोटी जिंकणे आवश्यक
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघ 2-1 ने पुढे आहे. टीम इंडियाने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी जिंकली होती. त्यानंतर दिल्ली कसोटी 6 गडी राखून जिंकली. तिसरा सामना इंदोरमध्ये पार पडला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने 9 गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत पुनरागमन केले. चौथी कसोटी जिंकणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर भारताला ही कसोटी जिंकावीच लागेल. जर टीम इंडिया हा सामना हरला, तर न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मुकणार
ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सलाही चौथ्या आणि शेवटच्या कसोटी संघाचा भाग असणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत चौथ्या कसोटीत स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल. स्मिथने एकदा सांगितले होते की, तो पुन्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवण्याची इच्छा बाळगत नाही, परंतु आता 33 वर्षीय खेळाडूला 9 मार्चपासून अहमदाबाद येथे होणार्या चौथ्या कसोटीत पुन्हा पदभार स्वीकारावा लागेल.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क मिशेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर.