पाचव्या कसोटीसह मालिका खिशात, भारताकडून 112 वर्षे जुना विक्रम मोडीत
| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
धर्मशाळा येथील पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत मालिका 4-1 ने जिंकली. भारतीय संघाने सामन्याच्या तिसर्याच दिवशी इंग्लंडचा मोठा पराभव केला. दुसर्या डावातही इंग्लिश फलंदाजांनी घोर निराशा केली. केवळ जो रुटने एकाकी झुंज दिली. त्याने 84 धावा केल्या. तर, भारताकडून रविचंद्रन अश्विनने दुसर्या डावात पाच गडी बाद केले. जसप्रीत बुमराहला दोन, तर कुलदीप यादवने दोन बळी घेतले. रवींद्र जडेजाही एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला. या विजयासह भारताने 112 वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.
कसोटी मालिकेत 0-1 अशा पिछाडीनंतर भारतीय संघाने सातव्यांदा मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने धर्मशाळा येथील हा सामना जिंकताच 112 वर्षांनंतर कसोटी इतिहासात ऐतिहासिक विक्रम केला. हा विक्रम पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावून पुढील चार सामने जिंकण्याचा आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीन वेळा असं घडले आहे. पहिल्यांदा 1897-98 दरम्यान घडले. तेव्हा अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. यानंतर ऑस्ट्रेलियानेच दुसर्यांदा या कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्यांनी 1901/02 च्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला होता.
तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव 218 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 477 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने 259 धावांची मजबूत आघाडी घेतली. त्यानंतर दुसर्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारताने ही कसोटी एक डाव 64 धावांनी जिंकली.