ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक!

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून 2036 आणि 2040 पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आयओसी यांनी दिली.

कोरोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे आयओसीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2024 ते 2032 पर्यंतच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस अँजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहेत . मात्र 2036, 2040 च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत. 2036 आणि 2040 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि कतार या चार देशांनी उत्सुकता दाखवली आहे, असे बाख म्हणाले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी बाख यांच्या मताला दुजोरा देत भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयारी करत असल्याचे सांगितले.

Exit mobile version