साहेबांच्या गोलंदाजांची काढली हवा; भारत मजबूत स्थितीत

रोहित,जडेजा शतके ठोकून गाजवलं राजकोट

| राजकोट | वृत्तसंस्था |

इंग्लंडविरूद्धच्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्याच सत्रात इंग्लंडने भारताचे तीन फलंदाज 33 धावात गारद केले. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी खुद्द कर्णधार रोहित शर्मावरच आली होती. रोहित शर्माने देखील 10 डावांची आपला दुष्काळ संपवत 131 धावांची दणदणीत शतकी खेळी केली. त्याने जडेजासोबत 204 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर सर्फराज खानने पदार्पणातच आपला दम दाखवत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. या तीन जणांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 326 धावा केल्या.

भारताची सुरूवात खुपच खराब झाली. पहिल्या दिवशी पहिल्या अर्धा तासाच्या आत मार्क वुडने भारताला दोन मोठे धक्के दिले. त्याने आधी यशस्वी जैस्वालला 10 धावावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नंतर शुभमन गिलला शुन्यावर आऊट केले. दुसरा कसोटी सामना खेळणार रजत पाटीदारही लवकर आऊट झाला, त्याला टॉम हार्टलीने बाहेरचा रस्ता दाखवला. लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात तीन गडी गमावून 93 धावा केल्या होत्या.

दुसर्‍या सत्रात भारताने 27 षटकांत एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या. या संपूर्ण सत्रात फलंदाजी करताना भारताने एकही विकेट न गमावण्याची तीन कसोटी सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने तीन गडी गमावून 185 धावा केल्या आहेत. चहापानानंतर दूसर्‍या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने शामदार शतक ठोकले. त्यानंतर शर्मा 131 धावा करून बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर आलेल्या सर्फराज खानने पदार्पणाच्या सामन्यात 104.2 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकत भारताला 300 धावांच्या पार पोहचवले. रविंद्र जडेजा देखील शतकाजवळ पोहचला होता. मात्र शतकी धाव घेताना गोंधळ झाला अन् सर्फराज 62 धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने पुढच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केलं. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या कुलदीप यादव आणि जडेजाने दिवसअखेर पर्यंत भारताला 5 बाद 326 धावांपर्यंत पोहचवले.

Exit mobile version