। इंग्लंड । वृत्तसंस्था ।
सलामीवीर रोहित शर्माची 256 चेंडूंत 127 धावांची आक्रमक खेळी आणि चेतेश्वर पुजाराच्या चिवट खेळीमुळे (127 चेंडूंत 61) भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात 171 धावांची आघाडी घेतली. तिसर्या दिवशी अंधूक सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा भारताने 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार विराट कोहली 22, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा 9 धावांवर खेळत आहे.
शुक्रवारच्या बिनबाद 43 धावांवरून पुढे खेळताना रोहित-राहुलच्या जोडीने 83 धावांची सलामी दिली. जेम्स अँडरसनने राहुलला 46 धावांवर बाद केले. त्यानंतर रोहित आणि पुजारा यांनी दुसर्या गडयासाठी 153 धावांची भागीदारी रचली. रोहितने मोईन अलीला षटकार लगावून दिमाखात शतकाची वेस ओलांडली. एकंदर आठवे शतक झळकावणार्या रोहितने कसोटी कारकीर्दीतील 3,000 धावांचा टप्पाही गाठला. ऑली रॉबिन्सनने रोहित आणि पुजाराला एकाच षटकात बाद केले.